GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर, चिपळूणसाठी ८१ लाखांचे ‘सोलर हायमास्ट’; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
167 Views

रत्नागिरी: संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील अनुसूचित जाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या दोन्ही तालुक्यांसाठी ‘सोलर हायमास्ट’ प्रकल्पाअंतर्गत तब्बल ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शेखर निकम यांनी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून, यामुळे अनेक वाड्या-वस्त्या प्रकाशमान होणार आहेत.

संगमेश्वर आणि चिपळूणमधील अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या निधीतून दोन्ही तालुक्यांतील अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये उच्च क्षमतेचे सौर दिवे (हायमास्ट) बसवण्यात येणार आहेत.

सोलर हायमास्ट प्रकल्पामुळे संबंधित वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी प्रकाशाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे तेथील नागरिकांची सुरक्षितता वाढण्यासोबतच दैनंदिन जीवनमान सुलभ होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे सौर ऊर्जेवर आधारित हा प्रकल्प असल्याने तो पर्यावरणपूरक आहे आणि विजेची बचत करणारा आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल.
विकासाची गंगा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे, या भूमिकेतून आमदार निकम यांनी हे प्रयत्न केले आहेत. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होऊन वाड्या-वस्त्यांवर प्रकाशझोत पडणार आहे.

Total Visitor Counter

3198642
Share This Article