दापोली : तालुक्यात असलेल्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावर शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र या गर्दीचा फायदा घेत काही पर्यटकांकडून सर्रास नियमभंग केला जात असून, समुद्रकिनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी, रेस लावणे आणि मद्यप्राशनाचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळे कुटुंबासह, लहान मुले व महिला पर्यटकांसह आलेले सामान्य पर्यटक भीतीच्या छायेखाली आपला वेळ घालवत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी समुद्रकिनारी वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही काळ उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. मात्र सध्या हे आदेश धुडकावून पर्यटक आपली वाहने थेट समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जात असून, हजारो पर्यटकांच्या गर्दीत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रेस लावल्या जात आहेत. काही ठिकाणी तर वाहनांच्या टपावर बसून मद्यप्राशन करत धिंगाणा घालण्याचे प्रकारही सर्रास घडताना दिसत आहेत. या बेजबाबदारपणामुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरणारे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, हजारोंच्या संख्येने पर्यटक उपस्थित असतानाही मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पोलीस बंदोबस्ताचा पूर्णपणे अभाव जाणवत आहे.
पर्यटनाला चालना मिळणे ही सकारात्मक बाब असली तरी नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षेचा बोजवारा उडाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुरुड समुद्रकिनाऱ्यावर तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवून वाहनांवर कठोर निर्बंध घालावेत, तसेच स्टंटबाजी व मद्यप्राशन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांसह सामान्य पर्यटकांकडून जोर धरू लागली आहे.
दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी स्टंटबाजीचा धुमाकूळ; पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर






