रत्नागिरी: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथील एका ६६ वर्षीय वृद्धाला सायबर चोरांनी तब्बल ६ लाख ९४ हजार ९९२ रुपयांचा गंडा दिला आहे. मुंबईतील घराचे गॅस बिल भरल्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपवर पाठवणे या फिर्यादीला चांगलेच महागात पडले असून, याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, निवेंडी येथील रहिवासी धनंजय विष्णू धोपटकर (वय ६६) यांच्या मुंबईतील सदनिकेचे महानगर गॅसचे बिल भरण्याबाबत त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून संदेश आला होता. धोपटकर यांनी गॅस बिल आधीच भरले असल्याचे सांगत त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट संबंधित नंबरवर पाठवला. त्यानंतर त्यांनी त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला असता समोरील व्यक्तीने फोन उचलला नाही. मात्र, काही वेळाने दुसऱ्या एका नंबरवरून त्यांना कॉल आला आणि गॅस बिलाबाबत विचारणा करत फोन होल्डवर ठेवण्यास सांगितले.
धोपटकर यांनी पाठवलेल्या स्क्रीनशॉटचा आधार घेऊन आणि फोन होल्डवर असताना तांत्रिक शिताफीने त्यांचा फोन हॅक करण्यात आला. फिर्यादीची कोणतीही संमती नसताना त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून काही वेळातच तीन मोठे व्यवहार झाले. सायबर चोराने गुगल पे (G-Pay) च्या माध्यमातून एकूण ६ लाख ९४ हजार ९९२ रुपये दुसऱ्या बँक खात्यात वळवून धोपटकर यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जयगड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी नंबरवर आपल्या आर्थिक व्यवहारांचे स्क्रीनशॉट किंवा ओटीपी शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.






