चिपळूण: भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू; मिरजोळी साखरवाडी येथील दुर्घटना

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read
Car hit scene, male person lying on the floor in front of a car

चिपळूण: गुहागर-विजापूर महामार्गावर मिरजोळी साखरवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका ७३ वर्षीय वृद्धाला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, चिपळूण पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोफळी येथील रहिवासी महंमद इब्राहिम सय्यद (वय ७३) हे १२ एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या एका आजारी मित्राची भेट घेऊन पायी परतत होते. सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ते मिरजोळी साखरवाडी येथील दि इलाईट बिल्डिंगसमोर आले असता, चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या स्प्लेंडर मोटार सायकलने (क्र. एम.एच.०८/ए.ई.६५७३) त्यांना मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, सय्यद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे मृत्यूशी झुंज देत असताना २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी मयत सय्यद यांच्या नातेवाईक नीलम इक्बाल अहमद दळवी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी मोटार सायकलस्वार सुनील बाळू सोलकर (रा. तनाली, सध्या लवेल-खेड) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. भरधाव वेगाने वाहन चालवून एका वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. महामार्गावर वाढत्या अपघातांच्या सत्रामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *