चिपळूणमध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत राडा; अंगणात कचरा टाकल्याच्या कारणावरून वृद्धेसह पतीला मारहाण

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

चिपळूण: तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला येथे जमिनीच्या जुन्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. अंगणात कचरा टाकल्याचा जाब विचारल्यामुळे एका वृद्ध महिलेला आणि त्यांच्या पतीला लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी सात जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैमुना इस्माईल बोंदले (वय ५२) आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होते, मात्र बोंदले यांनी आजवर पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नव्हती. २८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आरोपी अर्बिना खान हिने फिर्यादीच्या अंगणात कचरा टाकला. मैमुना यांनी ‘तुमच्या घरचा कचरा आमच्या अंगणात का टाकता?’ असा प्रश्न विचारला असता, त्याचा राग धरून अर्बिना हिने शिवीगाळ करत हातातल्या दगडाने मैमुना यांच्या ओठावर जोरात प्रहार केला.

हा वाद सोडवण्यासाठी मैमुना यांचे पती इस्माईल बोंदले तिथे आले असता, इतर सहा आरोपींनी त्यांना घेरले. यावेळी मन्सूर अली खान याने शेगल्याच्या काठीने इस्माईल यांच्या पाठीवर आणि डोक्यावर गंभीर वार केले. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी या दांपत्याला मारहाण केली. या घटनेनंतर जखमी मैमुना बोंदले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अर्बिना खान, मन्सूर अली खान, महिल अझीम खान, जमीर खान, राहिल अझीम खान, शरीफा अली खान आणि शबाना मन्सूर खान या सात जणांवर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या या हिंसक वळणामुळे वेहळे परिसरात तणावाचे वातावरण असून शिरगाव पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *