दापोलीतील आरोग्य सेविकेला मारहाण प्रकरणी आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी:दापोली तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित आरोपीवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. आरोग्य कर्मचारी अहोरात्र समाजाच्या सेवेसाठी कार्यरत असताना त्यांच्यावर होणारे असे भ्याड हल्ले अत्यंत निंदनीय असून, यामुळे संपूर्ण आरोग्य विभागामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही सादर करण्यात आल्या असून, प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, कामाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या असुरक्षिततेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली नाही, तर जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी आपल्या कामावर बहिष्कार टाकून कामबंद आंदोलन पुकारतील. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. या घटनेमुळे निर्माण झालेला पेच पाहता, आता प्रशासन दोषींवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *