GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरच्या कुंडी देवराईत दुर्मीळ ‘सह्याद्री राजस’ फुलपाखरु आढळले, जिल्ह्यात पहिलीच नोंद

Gramin Varta
48 Views

संगमेश्वर : वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षित असलेल्या दुर्मीळ ‘सह्याद्री राजस’ अर्थात सह्याद्री सिल्व्हर रॉयल या फुलपाखराची रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच नोंद झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंडी येथील देवराई परिसरात ही नोंद करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ही या प्रजातीची पहिली छायाचित्रित नोंद ठरली आहे. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संशोधकांनी हा महत्त्वपूर्ण शोध नोंदवला आहे.

सह्याद्रीच्या खोऱ्यात देवाखपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर कुंडी गाव वसले आहे. या परिसरात आजही समृद्ध जैवविविधता टिकून आहे. गावापासून जवळच महिमतगड आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेली श्री केदारलिंगची देवराई जैवसंपदेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. देवराईचे जतन केल्यामुळे येथे सस्तन प्राणी तसेच कीटकांची विविधता मोठ्या प्रमाणावर आढळते.
‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संशोधकांनी जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत कुंडी गाव व देवराई परिसरात ९५ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली होती. त्यानंतर संस्थेचे संशोधक प्रतीक मोरे आणि विराज आठल्ये यांनी या देवराईतून ‘सह्याद्री राजस’ या अत्यंत दुर्मीळ फुलपाखराची नोंद केली आहे.

‘सह्याद्री राजस’ ही ‘राजस’ फुलपाखराची उपप्रजाती असून ती केवळ सह्याद्री परिसरात आढळणारी प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे. या फुलपाखरांच्या पंखांचा विस्तार साधारण ३० ते ४० मिलीमीटर असून त्यावर चांदी-निळसर रंगाच्या ठळक खुणा दिसून येतात. यापूर्वी या प्रजातीचा अधिवास पश्चिम घाटाच्या दक्षिण भागापुरताच मर्यादित असल्याचे मानले जात होते. नंतर आंबोली आणि पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी परिसरात तिची नोंद झाली होती; मात्र ती छायाचित्रित नव्हती. ही प्रजाती वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार द्वितीय श्रेणीत संरक्षित आहे.

Total Visitor Counter

3376120
Share This Article