GRAMIN SEARCH BANNER

देवरुख: जिल्हास्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये ईश्वरी आणि रितीशा कांगणे यांची सुवर्णमय कामगिरी

Gramin Varta
71 Views

देवरुख: १९ व्या रत्नागिरी जिल्हा खुल्या चॅलेंज क्यूरोगी आणि १३ व्या पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५-२६ या स्पर्धेत संगमेश्वर तालुका तायक्वांदो क्लब, देवरुखच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेत कु. ईश्वरी मंगेश कांगणे आणि रितीशा संजय कांगणे यांनी सुवर्णपदकांची लयलूट करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेतील कामगिरीबाबत सविस्तर वृत्त असे की, कॅडेट मुलींच्या ६० किलोवरील वजनी गटात ईश्वरी मंगेश कांगणे हिने अत्यंत चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यावर मात करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या आक्रमक खेळामुळे उपस्थितांच्या नजरा तिच्या कामगिरीवर खिळून राहिल्या होत्या. दुसरीकडे, रितीशा संजय कांगणे हिने या स्पर्धेत दुहेरी यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रितीशाने सबज्युनिअर मुलींच्या २४ किलोखालील वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले, तसेच रेग्युलर ग्रुप पुमसे प्रकारातही आपल्या शिस्तबद्ध सादरीकरणाच्या जोरावर सुवर्णपदक मिळवून दुहेरी मुसंडी मारली.

या दोन्ही खेळाडूंच्या यशात त्यांच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे. शशांक घडशी, स्वप्नील दांडेकर, सुमित पवार आणि मिस राऊत यांनी दिलेल्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणामुळेच या खेळाडूंनी जिल्हा स्तरावर हे यश खेचून आणले आहे. या यशाबद्दल संगमेश्वर तालुका तायक्वांदो क्लब देवरुखचे सर्व पदाधिकारी, पालक आणि सहकारी खेळाडूंकडून ईश्वरी आणि रितीशावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात गाजवलेल्या या कामगिरीमुळे तायक्वांदो खेळात नव्या पिढीचा उत्साह वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. सर्व स्तरांतून या दोन्ही सुवर्णविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे.

Total Visitor Counter

3369437
Share This Article