GRAMIN SEARCH BANNER

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत एका महिन्यात ३० कोटी ५ लाखांच्या ठेवी संकलित

रत्नागिरी:  येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाची सांगता झाली. या कालावधीत ३० कोटी ५ लाखांच्या ठेवी जमा झाल्याचीच माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

आतापर्यंतचा हा उच्चांक असून यापूर्वी एका ठेववृद्धी मासात १८ कोटी ठेवी जमा झाल्या होत्या. पतसंस्थेच्या ठेवींनी ३७९ कोटींचा टप्पा ओलांडला असून आर्थिक संस्थेला अभिमान वाटावा, अशी ही स्थिती असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.

या ठेव वृद्धी मासात मुदत संपल्याने नूतनीकरण केलेल्या ठेवी ८७ कोटी ३८ लाख रुपये असून एकूण रुपये ११७ कोटी ४३ लाखांचे ठेव व्यवहार ठेववृद्धी मासात झाले. २७० ठेवीदारांनी संस्थेकडे आपली ठेव रक्कम नव्याने ठेवली. संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांचा प्रतिसाद मिळाला.

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या एकूण ठेवी ३७९ कोटी ३० लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. स्वरूपानंद पतसंस्थेने विविध कारणासाठी वितरित केलेले येणे कर्ज २६४ कोटी ३ लाख रुपये आहे. माहे जूनपर्यंत कर्जाची वसुली ९९.७१ टक्के इतकी विक्रमी राहिली आहे. संस्थेने प्रमाणबद्ध पद्धतीने अपेक्षित असल्याप्रमाणे एस.एल.आर, विविध निधींची १०० टक्के गुंतवणूक महाराष्ट्र सहकार कायदा कलम ७० अ नुसार योग्य बँकेत केलेली आहे, अशी माहिती ॲड. पटवर्धन यांनी दिली.

संस्थेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण २८ टक्के इतके भरभक्कम आहे. संस्थेचा सीडी रेशो ६७ टक्के इतका आहे. संस्थेच्या आर्थिक ताकदीचा निर्देशक असणाऱ्या स्वनिधी पोटी रुपये ४८ कोटी १३ लाख संस्थेकडे जमा आहे. ठेववृद्धी मासात प्रत्येक शाखेला स्वतंत्र उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजनबद्ध संपर्क, संवाद साधून समाजातील सर्व स्तरातून ठेव संकलित केली. २७० नवे खातेदार या ठेव वृद्धीमासादरम्यान संस्थेशी संलग्न झाले.

जनमानसात संस्थेची असलेली पारदर्शक प्रतिमा, संस्थेवर असलेला विश्वास यानिमित्ताने प्रतिबिंबित झाला, असे सांगत संस्थेचे अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी सर्व ठेवीदारांना धन्यवाद दिले. संस्था सर्व ग्राहक सभासदांना उत्तमोत्तम आर्थिक सेवा देण्याचे व्रत सदैव सुरू ठेवेल, असे सांगितले. ठेववृद्धी मासापूर्वी जाहीर केल्यानुसार संस्थेकडे नव्याने ठेव ठेवलेल्या प्रत्येक ठेवी मागे २०० रुपये संस्था सामाजिक दायित्व निधी मधून सैनिक कल्याण निधीसाठी देणार असल्याचे ॲड. पटवर्धन म्हणाले.

Total Visitor Counter

2455624
Share This Article