चिपळूण: गणेशोत्सव तोंडावर असताना, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चिपळूण पोलिसांनी गणेश मंडळांसाठी आणि नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी बेले आणि पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी मंडळांना मार्गदर्शन करताना या सूचनांची माहिती दिली आहे. या नियमांनुसार, सार्वजनिक गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही साऊंड सिस्टिमचा वापर करण्यास मनाई असेल. मंडळांनी कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, मंडळांनी उत्सवाच्या काळात लेझर लाईटचा वापर करू नये, असेही बजावण्यात आले आहे.
प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश मूर्ती बसवण्यापूर्वी पोलिसांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आयडी कार्ड अनिवार्य असून त्यांनी विशिष्ट ड्रेस कोड वापरणे आवश्यक आहे. मंडळांनी उभारलेल्या स्वागत कमानी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा ठरू नयेत, यासाठी त्या पुरेशा उंच असाव्यात. गणेशोत्सवाच्या काळात शांतता राखण्यासाठी सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि मिरवणुका सुलभ करण्यासाठी जड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिसांनी जाहीर केलेल्या या सूचनांचे पालन करून सुरक्षित आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन DYSP बेले आणि पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.