GRAMIN SEARCH BANNER

सुशांतसिंग राजपूत प्रकरण: सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाकडून रिया चक्रवर्तीला नोटीस

मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. सीबीआयनं या प्रकरणी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नोटीस रियाला पाठवण्यात आली आहे.

रियानं सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयने तपास करत मार्च 2025 मध्ये हा अहवाल कोर्टात सादर केला होता. ही नोटीस कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे. यामध्ये रियाला सीबीआयच्या अहवालावर आक्षेप घेण्याची संधी देण्यात आली आहे. मुंबईतील मुख्य महानगर दंडाधिकारी आर.डी. चव्हाण यांनी याप्रकरणी जारी केलेल्या नोटीसला 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या दोन बहिणी प्रियांका सिंग, मितू सिंग आणि डॉ.तरुण नथुराम यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तिघांनी योग्य प्रिस्क्रिप्शनशिवाय सुशांतला औषध दिल्याचा आरोप रियाने केला आहे.सुशांतला ‘बायपोलार डिसऑर्डर’ हा मानसिक आजार असल्याचे निदान झाले होते. तो सतत उपचार घेत नव्हता. अधूनमधून औषधे घेणे थांबवायचा. तो मानसिकदृष्ट्या आजारी असूनही त्याच्या बहिणींनी मेसेजद्वारे औषधे सुचविली होती. औषधे मिळविण्यासाठी वापरलेले प्रिस्क्रिप्शन बनावट होते, असा दावा रियाने केला आहे. आता यावर सीबीआयने एक अहवाल सादर केला आहे. तो रिया स्वीकारते की त्यावर आक्षेप घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.दरम्यान, मुळचा बिहारचा रहिवासी असलेला 34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे (मुंबई) येथील अपार्टमेंटमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे प्रकरण अजूनही कोर्टात सुरु आहे. आता पाच वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

Total Visitor Counter

2455607
Share This Article