मुंबई : रेल्वेच्या आरक्षित डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता अधिक कठोर कारवाई होणार आहे. तसेच विनातिकीट प्रवास, महिलांसाठी राखीव डब्याचा गैरवापर आणि दुसऱ्याच्या नावावरील तिकीट वापरणे अशा नियमभंगाच्या प्रकारांवरही मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे कायदा, १९८९ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून मध्य रेल्वेने प्रवाशांना नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सुधारित नियमांनुसार, रेल्वे कायद्यातील कलम १३७ अंतर्गत योग्य तिकीट किंवा वैध पासशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासाचे संपूर्ण भाडे आणि अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार असून या अतिरिक्त शुल्काची किमान रक्कम ५०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. संबंधित प्रवाशाने ही रक्कम भरण्यास नकार दिल्यास प्रकरण न्यायालयात पाठवले जाईल. त्यानंतर न्यायालय दोषीला सहा महिन्यांपर्यंत कारावास, ५०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावू शकते.
रेल्वे कायद्यातील कलम १५५ अंतर्गत आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम ५०० रुपयांवरून थेट २ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय आरक्षित डब्यात अधिकृत प्रवाशांना प्रवेश करण्यास अडथळा आणणाऱ्यांवर १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. दंड भरण्यास नकार दिल्यास संबंधित प्रकरण न्यायालयात जाईल. अशा वेळी न्यायालय ३ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याबरोबरच संबंधित व्यक्तीला डब्यातून बाहेर काढण्याचे आदेशही देऊ शकते.
महिलांसाठी राखीव डब्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधातही नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. कलम १६२ नुसार महिलांसाठी राखीव डब्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर आता २ हजार ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. दंड न भरल्यास न्यायालयाकडून ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.
तिकीट हस्तांतरणाबाबतही रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. कलम १४२ अंतर्गत दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील तिकीट वापरणे किंवा अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करून प्रवास करणे हा नियमभंग मानला जाणार आहे. अशा प्रकरणात संबंधित तिकीट जप्त करण्यात येईल तसेच प्रवासाचे भाडे आणि अतिरिक्त शुल्क वसूल केले जाईल. ही रक्कम न भरल्यास न्यायालय संबंधित व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा २ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा सुनावू शकते.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी वैध तिकीटासहच प्रवास करावा, आरक्षित तसेच महिलांसाठी राखीव डब्यांच्या नियमांचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारचा नियमभंग टाळावा, असे आवाहन केले आहे. नव्या सुधारित तरतुदींमुळे रेल्वेतील शिस्त अधिक प्रभावी होण्यास आणि अधिकृत प्रवाशांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
रेल्वेच्या आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवेश पडणार महागात; आता २ हजारांपर्यंत दंड, रेल्वे कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा
Leave a Comment






