रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) रत्नागिरी एमआयडीसीमधील एका प्लॉटवर छापा टाकून देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी नेपाळी महिलेला ताब्यात घेऊन तिच्यावर ‘अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिच्या ताब्यातून पुणे येथील दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला एमआयडीसी, मिरजोळे येथील प्लॉट ई-६९ मध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले.
पोलीस पथकाने बनावट ग्राहक (डमी) पाठवून खात्री केली. खात्री पटल्यानंतर पथकाने ठरलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे एक नेपाळी महिला दोन महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ तिच्यावर ‘अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६’ नुसार गुन्हा दाखल करून, तिला ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी, देहविक्रीच्या व्यवसायात अडकलेल्या दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. पुढील कारवाईसाठी हा गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर, संदीप ओगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वाती राणे, शितल कांबळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पाटील आणि पोलीस नाईक दत्ता कांबळे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अंकुश बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.