सुरत : राज्यातील मंत्री, राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवर सोशल मीडियावर अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणारा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला गुजरातमधील सूरत पोलिसांनी चोरी प्रकरणी अटक केली.
तपासाच्या नावाखाली दहशत माजवत दोन मोबाईल फोन आणि दोन लाखांची रोकड कासले याने लुटल्याचा व्हिडिओ सूरत पोलिसांनी व्हायरल केला आहे. चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर अशी चूक पुन्हा होणार नाही, असे म्हणत हात जोडून माफी मागतानाच कासलेचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलिसांनी केला व्हिडिओ व्हायरल
कासले याने पोलीस चौकशीच्या नावाखाली दोघांना लुटल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सुरत पोलिसांना मिळाला. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर कासले यास गुजरात पोलिसांनी लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर सुरत पोलिसांनी गुन्हा कबूल करत माफी मागणाऱ्या रणजीत कासलेचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. सुरत पोलिसांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कासले हा तपासाच्या नावाखाली एक महिला अणि पुरुषाची चौकशी करत आहे. यानंतर या दोघांना धमकावत त्यांच्याकडून मोबाईल फोनही हिसकावून घेतला आहे. तसेच त्यांच्याकडील दोन लाख रुपयांची रोकडही लंपास केली. यानंतर याच व्हिडिओमध्ये कासले आपला गुन्हाही कबुल केला आहे. यापुढे आयुष्यात अशी चूक करणार नाही, असे सांगत त्याने आपला माफीनामा सादर केला आहे.
कासलेवर अनेक गुन्हे दाखल
कासले हा बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर वाल्मीक कराड याबाबतच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रणजीत कासले यांनी व्हायरल केले होते. या शिवाय मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांवरही कासले याने गंभीर आरोप केले होते. पोलीस दलातून बडतर्फ झाल्यानंतर त्याने याने मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हिडीओ करत अनेक खुलासे केले आहेत. अनेक नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर आरोपही केले.तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावाही सोशल मीडियवर व्हिडिओ व्हायरल करत कासले यांनी केला होता. कासलेविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले निघाला मोबाईल चोरटा! सूरत पोलिसांनी केला व्हिडिओ व्हायरल
