GRAMIN SEARCH BANNER

खेड-नातूनगरजवळ मर्सिडीज कार जळून खाक; तिघे प्रवासी बचावले

Gramin Varta
156 Views

खेड : नाशिकहून गणपतीपुळेकडे पर्यटनासाठी निघालेली एक आलिशान मर्सिडीज बेंझ कार मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगरनजीक सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील तिघे प्रवासी बालंबाल बचावले, मात्र या घटनेत एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. ‘बर्निंग कार’चा हा थरार महामार्गावर काही काळ पाहायला मिळाला.

नाशिक येथील रहिवासी असलेले आकाश कुमावत हे आपल्या ताब्यातील मर्सिडीज बेंझ कारमधून (एमएच ०२ बीझेड १४००) अन्य दोन सहकाऱ्यांसह नाशिक येथून महाड-नातूनगर मार्गे गणपतीपुळेकडे प्रवास करत होते. कार नातूनगरनजीक आली असताना, रस्त्यावर समोर आलेल्या वन्यप्राण्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली. यानंतर कार मागे घेत असताना अचानक कारने पेट घेतला. चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला थांबवली. तिघेही प्रवासी सुखरूपपणे कारमधून बाहेर पडले. मात्र, बाहेर पडत असताना एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. जखमीला तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारला आग लागल्याची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्रातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि वाहनचालक गजानन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे काही क्षणांतच संपूर्ण कार भस्मसात झाली. अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी धुमसणारी आग पूर्णपणे विझवल्यानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला खोळंबलेली वाहतूक पूर्ववत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला.

Total Visitor Counter

3369792
Share This Article