पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, डॉ. कांचन मदार आणि मंगेश पेढांबकर यांचा सन्मान
चिपळूण: गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ चिपळूणमधील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या नाटक कंपनी चिपळूण या संस्थेच्या वतीने यंदाच्या विजयादशमीचे औचित्य साधत, वर्षभर सोन्यासारखं काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान ‘सोने’ देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमात चिपळूण पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार, तसेच नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांचा गौरव करण्यात आला.
संस्थेचे मार्गदर्शक आणि अभिनेता ओंकार भोजने यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाटक कंपनी चिपळूण ही संस्था प्लास्टिक मुक्त चिपळूणसाठी नगर परिषदेसोबत मोहीम राबवत आहे. यासोबतच सामाजिक जाणिवा जपत, विविध उपक्रमांतून जनजागृतीचं कामही सातत्याने करत आहे.
पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व त्यांच्या टीमने चिपळूण शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वर्षभर अथक परिश्रम घेतले. तर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारीच नव्हे, तर मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत संकलन करून ती पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, डॉ. कांचन मदार यांनी वैद्यकीय सेवेत कार्यरत राहून, सामाजिक भान जपत, अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत रुग्णसेवेचे उदाहरण ठेवले आहे. नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी शहराच्या विकासात आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले आहे.
या कार्यक्रमाला नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, माजी अध्यक्ष श्रवण चव्हाण, सचिव तुषार जाधव, तसेच समिधा बांडागळे, मार्तंड माजलेकर यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सेवाभावी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा असा सन्मान हा शहरात एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.
नाटक कंपनी चिपळूणतर्फे विजयादशमी निमित्त सेवाभावी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘सोने’ देऊन गौरव
