लांजा: लांजा तालुक्यात बिबट्याचा वाढता उपद्रव सुरूच असून, आता या बिबट्याने थेट लांजा शहराकडे आपला मोर्चा वळवला आहे. काल रात्री (शनिवारी) लांजा बौद्धवाडी येथे भरवस्तीत एका बिबट्याने गोठ्यात शिरून पाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात एका पाडीचा मृत्यू झाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लांजा तालुक्याच्या विविध भागांत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, आता बिबट्याने थेट लांजा शहरातील बौद्धवाडीसारख्या भरवस्तीत मुक्त संचार सुरू केल्याने चिंता व्यक्त होत आहे.
शनिवारी रात्री उशिरा, बौद्धवाडी येथील संदीप कांबळे यांच्या घराजवळील गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कांबळे यांच्या एका पाडीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत संदीप कांबळे यांचे अंदाजे पाच ते दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
भरवस्तीत बिबट्याने केलेल्या या हल्ल्यामुळे लांजा बौद्धवाडीसह संपूर्ण शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.