GRAMIN SEARCH BANNER

महावितरणच्या सदोष वीज यंत्रणेमुळे लागणाऱ्या वणव्यांनी शेतकरी हवालदिल; मनसेची रत्नागिरीत नुकसानभरपाईसाठी धडक

Gramin Varta
46 Views

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील महावितरणच्या सदोष वीजपुरवठा व्यवस्थेमुळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे ग्रामीण भागात वणव्यांचे प्रमाण वाढले असून, याचा मोठा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसत आहे. करबुडे पंचक्रोशीत या वणव्यांमुळे आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर समस्येबाबत निवेदन सादर केले.

तालुक्यातील अनेक भागांत वीजवाहिन्यांचे घर्षण किंवा तांत्रिक बिघाडामुळे ठिणग्या पडून बागांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असून, अनेक छोट्या बागायतदारांचे आर्थिक कणाच मोडला आहे. या प्रलंबित नुकसानभरपाईचा प्रश्न महावितरणने तातडीने मार्गी लावावा आणि भविष्यात असे वणवे रोखण्यासाठी सदोष वीज यंत्रणेची दुरुस्ती करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या वेळी मनसेच्या वतीने लावून धरण्यात आली. या चर्चेदरम्यान महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या प्रकरणात तत्परतेने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

या वेळी मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासोबत तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, उपविभाग अध्यक्ष अर्जुन घाणेकर, सर्वेश जाधव तसेच करबुडे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीज वितरणातील त्रुटींमुळे होणारे नैसर्गिक नुकसान टाळण्यासाठी महावितरणने गांभीर्याने पावले न उचलल्यास पुढील काळात अधिक तीव्र भूमिका घेण्याचे संकेतही या वेळी देण्यात आले आहेत.

Total Visitor Counter

3199496
Share This Article