पुणे: जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं बुधवारी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. माधव गाडगीळ यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
पुण्यातल्या डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रूग्णालया त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार चालू होते. मात्र, आज उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
भारतातील पर्यावरणविषयक जाणिवा आणि विशेषत: पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणं यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. पश्चिम घाटांमध्ये राबवल्या जाणाऱ्या विकासकामांमुळे घाटातील जीवसृष्टी आणि एकूण पर्यावरणीय समतोलासाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं, हा धोक्याचा इशारा सर्वप्रथम माधव गाडगीळ यांनीच प्रशासनाला दिला. पश्चिम घाटाच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी २०११ साली तयार केलेला गाडगीळ अहवाल म्हणजे विकासकामांसाठी पर्यावरणाला धक्का पोहोचवण्यासाठी कायम तयार असलेल्या मानसिकतेला ढळढळीत वास्तव दाखवणारा आरसा ठरला.
UNEP चे चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ!
डॉ. माधव गाडगीळ यांनी भारतातील पर्यावरणविषयक मुद्द्यांवर दिलेल्या योगदानाची दखल संयुक्त राष्ट्रांनीदेखील घेतली. गाडगीळ यांना २०२४ सालच्या यूएनईपीचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. “सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत डॉ. माधव गाडगीळ यांचा प्रवास हार्वर्ड विद्यापीठाच्या सभागृहांपासून ते भारत सरकारच्या उच्चपदापर्यंत झाला. पण या संपूर्ण प्रवासात माधव गाडगीळ यांनी स्वत:ला ‘जनतेचा वैज्ञानिक’च मानलं”, अशा शब्दांत UNEP च्या निवेदनात डॉ. माधव गाडगीळ यांचा गौरव करण्यात आला आहे.
२०२१ साली डॉ. माधव गाडगीळ यांनी पूर, ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत सूचक आणि महत्त्वपूर्ण भाष्य केलं होतं. “पश्चिम घाटांमध्ये हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. इथे गेल्या काही वर्षांपासून अशा दुर्घटना घडत आल्या आहेत. हिमालयात आपण गेल्या ५० वर्षांत अशा प्रकारच्या पुराच्या घटना पाहिल्या आहेत. १९७२ साली उत्तराखंडमध्ये झालेलं चिपको आंदोलन हेच मुळात अलकनंदामध्ये वृक्षतोड व डोंगराचे उतार फोडल्यामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीचा निषेध म्हणून सुरू झालं होतं. वर्षानुवर्षे हे प्रकार वाढतच गेले आहेत. हिमालयाची रचना ही भारतीय व युरेशियन प्लेट्सची धडक झाल्यानंतर वली पर्वताच्या रुपात तयार झाली आहे. तिथली जमीन ही हिमस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटनांसाठी अधिक संवेदनशील आहे. त्याउलट पश्चिम घाटांतील पर्वतरांगा या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या खडकांमुळे अस्तित्वात आल्या आहेत”, असं विश्लेषण त्यांनी केलं होतं.
गाडगीळ समितीचा अहवाल…
डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली २०११ साली पश्चिम घाट तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने पश्चिम घाटातील १ लाख २९ हजार ०३७ चौरस किलोमीटरचा पूर्ण परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची शिफारस केली. कारण या भागात दाट जंगल आणि अस्तित्व धोक्यात आलेल्या अनेक प्रजाती पाहायला मिळाल्या होत्या. या अहवालावर काही राज्यांनी निर्बंधांचं स्वरूप अन्याय्य असल्याचं म्हणत टीकाही केली होती. तीन वर्षांनंतर वैज्ञानिक के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने ७५ टक्क्यांवरून हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत खाली आणलं. पण या अहवालावरदेखील अद्याप पूर्ण स्वरूपात कार्यवाही होऊ शकलेली नाही.







