GRAMIN SEARCH BANNER

लांजा : भावोजीच्या घरात मेहुण्याने मारला डल्ला, 3 लाखांचा ऐवज लंपास

Gramin Search
9 Views

लांजा : तालुक्यातील केळंबे येथील अमृतसृष्टी, नामदेव नगर येथे एका घरातून सुमारे ३ लाख ३६ हजार १५० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीच्या सख्ख्या मेहुण्यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. नातेसंबंधामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज गणपती जाधव (रा. अमृतसृष्टी, नामदेव नगर, लांजा, मूळ रा. कर्नाटक) हे ४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून ५ एप्रिल सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत बेळगाव येथे गेले होते. याच दरम्यान, त्यांचा मेहुणा राज नारायण राठोड (२४, रा. केळंबे नामदेवनगर, लांजा, मूळ रा. कर्नाटक) याने जाधव यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत घरात प्रवेश केला. त्याने घरातून ४१,१५० रुपये किमतीची सोन्याच्या तीन अंगठ्या, १५,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा व्ही-३० मॉडेलचा ५-जी मोबाईल फोन आणि २,८०,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

फिर्यादी युवराज जाधव हे परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. मात्र, आरोपी हा त्यांचा नातेवाईक असल्याने त्यांनी तो परत येईल या आशेने वाट पाहिली. परंतु, राज राठोड घरी परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर, जाधव यांनी मंगळवार, १७ जून रोजी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून राज राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला असून, लांजा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2648096
Share This Article