GRAMIN SEARCH BANNER

गणेशोत्सवाच्या देखाव्यात साकारली कोकणातील पर्यटन स्थळे

संगमेश्वर येथील अभिषेक खातू आणि कुटुंब यांची पर्यावरणपूरक   सजावट

सचिन यादव / धामणी

गणेशोत्सव म्हणजे सर्व भक्तांसाठी आनंदाची पर्वणी असते. बाप्पा घरी आल्यावर भक्त वेगवेगळ्या प्रकारचे मकर आणि देखावे बनवतात.  विविध देखावे हे खरे या उत्सवातील खास आकर्षण असते. त्यात काही देखावे हे तर सामाजिक संदेश देणारे असतात. असाच देखावा संगमेश्वर येथील खातू कुटुंबियांनी वर्तमान पत्र आणि कागदांच्या पुठ्यापासून पर्यावरण पूरक तयार केले आहे. या देखाव्यात त्यांनी कोकणातील पर्यटन स्थळे दाखवत कोकण सौंदर्याची देणगी असल्याचे दाखविले आहे.

कोकण आणि तेथील निसर्ग सौंदर्य याची भुरळ सर्वच पर्यटक यांना असते. येथील पर्यटन स्थळे  सर्वांना माहिती व्हावीत आणि त्यांचा प्रसार व प्रचार व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेवत  संगमेश्वर येथील अभिषेक खातू आणि कुटुंबीय यांनी गेली दोन महिने मेहनत घेत पर्यावरण पूरक असा देखावा बनवला. अभिषेक खातू हे व्यवसायाने छायाचित्रकार   आहेत. ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारतात. त्यांनी यावर्षी देखाव्यात कोकणातील पर्यटन स्थळे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांनी संगमेश्वर रेल्वेस्टेशन, मार्लेश्वर मंदिर, कर्णेश्वर मंदिर, छत्रपती संभाजी महाराज स्मारक अशी विविध स्थळे त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. अजून एक खास बाब म्हणजे त्यांच्या घरातील बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीची असते. त्यांची सजावट नेहमीच इकोफ्रेंडली असते. पर्यावरण पूरक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे ते नेहमी साकारून गणेशोत्सवातून ते वेगळा संदेश देत असतात.  कोकणातील पर्यटन स्थळे सर्वांना माहिती व्हावीत आणि तिथं पर्यंत पर्यटक यांनी यावे हा त्यांचा हेतू आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. यासाठी पर्यावरण जपले पाहिजे असाही त्यांनी संदेश दिला आहे. त्यांचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. तालुक्यात त्यांच्या कलेचे कौतुक होत आहे.

हल्ली कोकणातील तरुण पिढी नोकरीच्या शोधात मुंबई पुणे यासारख्या शहरात धाव घेताना आपण बघतोय या मध्ये माझ्या संगमेश्वर तालुक्यातील मुलांचा सुध्दा समावेश आहे
कोकणातील तरुणांनी गावात राहून आपल्या इथे अनेक पर्यटन स्थळे आहेत याचा विचार करून एक मोठा टूरीस्ट हब होऊ शकते हे या देखाव्यातून दाखवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे .
हा देखावा तयार करण्यासाठी दोन महिने लागले यामध्ये शशांक खातू,शंकर खातू, शुभम खातू यांचं महत्त्वाचा सहभाग आहे त्यामुळे हा परिपूर्ण देखावा तयार झाला.

अभिषेक खातू
संगमेश्वर

Total Visitor Counter

2474801
Share This Article