रत्नागिरी: बेकायदेशीर मासेमारीविरूद्ध शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे शिष्टमंडळ सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडकले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला.रत्नागिरीच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये पर्ससीननेट, एलईडी आणि मिनी पर्ससीनद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मासेमारी सुरू असल्याचा गंभीर आरोप शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजीत उर्फ छोट्या भाटकर यांनी केला आहे. मत्स्य विभागाच्या सागरी सुरक्षारक्षकांच्या आशीर्वादानेच हे अवैध प्रकार सुरू असून, “चार मासे मिळावेत यासाठी ते आपले कर्तव्य बासनात गुंडाळत आहेत. अशा सुरक्षारक्षकांना नोकरीवरून काढून टाका,” असा सज्जड दम भाटकर यांनी सहाय्यक मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजेच १२.५ नॉटिकल मैलच्या आतील समुद्रात ही बेकायदा मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशारा असल्याने पारंपरिक मच्छीमार नौका बंदरातच होत्या. या सर्व घडामोडींमुळे पारंपरिक मच्छीमार मोठ्या अडचणीत आले आहेत. कर्ला, राजिवडा, मिरकरवाडा, जयगड आदी ठिकाणी एलईडी मासेमारी आणि मिनी पर्ससीननेट मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू असूनही या नौकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, या मागणीसाठी आज शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे शिष्टमंडळ सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकले.
मत्स्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना भाटकर यांनी विचारले की, “मत्स्यखात्याला पारंपरिक मच्छीमारांच्या १० वावामध्ये मासेमारी करणाऱ्या नौका ड्रोन कॅमेऱ्यामध्ये येतात, मग ५ वावात पर्ससीनद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका का दिसत नाहीत?” या प्रश्नावर त्यांनी मत्स्यविभागाच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेतला. किनाऱ्यावर क्रेनने बोटीमध्ये जनरेटर चढवले जातात, एवढी मोठी क्रेन अधिकाऱ्यांच्या नजरेस का पडत नाही, याचा अर्थ सर्वांच्या आशीर्वादाने एलईडी मासेमारी सुरू आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
या प्रश्नावर तातडीने कारवाई न झाल्यास संयम ढळेल, असा इशारा देत संघाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. “आम्हाला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. जर आम्ही कायदा हातात घेतला तर कुचकामी ठरलेल्या मत्स्य विभागालादेखील टाळे ठोकू,” असा गंभीर इशारा देत पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मत्स्यविभागाला दिले.