कोल्हापूर : तीन तासांहून अधिक काळ वाट पाहूनदेखील एसटी उपलब्ध झाली नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे जाणारे प्रवासी संतापले. त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकामधील (सीबीएस स्टँड) रस्त्यावरच ठिय्या मारला.या स्थानकाच्या प्रवेशद्वारामध्ये रास्ता रोको करत एसटी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजल्यापासून काही प्रवासी सीबीएस स्टँड येथे एसटीची प्रतीक्षा करत होते. तासाभरात त्यांची संख्या वाढली. मात्र, सायंकाळी सात, रात्री आठ आणि नऊ वाजता येणाऱ्या अनुक्रमे लातूर, अंबेजोगाई आणि विजापूर-रत्नागिरी या तिन्ही एसटी कोल्हापुरात वेळेत आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली.
एक-दीड तास उलटला, तरी एसटी आली नाही. त्यांनी नियंत्रण कक्षात विचारणा केली असता, त्यांना एसटी येईल असे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर वाट बघूनदेखील एसटी येत नसल्याचे पाहून या प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांचा संताप वाढला. त्यातील काही प्रवाशांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. काहींनी स्टँडच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोखला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस त्याठिकाणी आले. त्यांनी मध्यस्थी करत प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान कोल्हापूर आगाराच्या व्यवस्थापनाने जादा एसटी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवासी शांत झाले आणि त्यांची गर्दीदेखील कमी झाली.
लातूर, अंबेजोगाई, विजापूरहून येणाऱ्या एसटींना विलंब झाला. त्यामुळे नाणीजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली. त्यावर कोल्हापूर आगारातर्फे जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची सोय करण्यात आली.- यशवंत कानतोडे, प्रभारी विभाग नियंत्रक, कोल्हापूर
कोल्हापूर: नाणीजला जाण्यासाठी गाडी नसल्याने प्रवाशांचा उद्रेक
