मुंबई:ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेत उत्तर प्रदेश सरकारने अंड्यांच्या विक्रीबाबत नवा नियम लागू केला आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून उत्तर प्रदेशमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर ‘एक्सपायरी डेट’ नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांना ताजी अंडी मिळण्यास मदत होणार असून, अन्न सुरक्षेच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
नियम मोडल्यास कठोर कारवाई
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (FSDA) आणि पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच, खराब किंवा जुनी अंडी जप्त करून नष्ट केली जातील किंवा मानवी सेवनासाठी अयोग्य असा शिक्का मारला जाईल. राज्यात अनेक ठिकाणी जुनी आणि खराब अंडी विकली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंड्यांची साठवणूक किती दिवस सुरक्षित?
पशुसंवर्धन विभागाने अंड्यांच्या टिकाऊपणाबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत:
३०°C तापमानात: अंडी साधारण २ आठवडे सुरक्षित
२°C ते ८°C (फ्रिजमध्ये): अंडी ५ आठवड्यांपर्यंत सुरक्षित
कोल्ड स्टोरेजसाठी वेगळे नियम?
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनच्या नियमानुसार, अंडी आणि भाजीपाला एकाच कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येणार नाहीत, कारण दोन्हींसाठी आवश्यक तापमान आणि वातावरण वेगळे असते. सध्या आग्रा आणि झाशी येथे अंड्यांसाठी स्वतंत्र कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध आहेत.
राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश मेश्राम यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, नियमांचे उल्लंघन अनेक ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नव्या नियमांमुळे ग्राहकांना ताजी आणि सुरक्षित अंडी मिळतील, तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये जबाबदारी वाढेल.





