खेड: शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकावर शुक्रवारी रात्री उशिरा खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी शिक्षकाचा मोबाईल जप्त केला आहे. त्यात विनयभंगाचे व्हिडिओ आणि फोटोही आढळल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक खासगी शिकवण्या घेत होता. शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत त्याने गैरवर्तन केले. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने या कृत्याचे व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षकाचा मोबाईल जप्त केला आहे.
पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांच्या निदर्शनास आणल्यानंतर, त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या शिक्षकाने यापूर्वीही अशाच प्रकारचे कृत्य केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.