GRAMIN SEARCH BANNER

आंबेनळी घाटात कार दरीत कोसळली; 10 वर्षीय मुलाच्या धैर्यामुळे 5 जणांचे प्राण वाचले

Gramin Varta
627 Views

रायगड : अमरावतीहून देवदर्शन करत कोल्हापूरमार्गे किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची नेक्सॉन कार महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शुक्रवारी सकाळच्या सुमारास सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले असून तिघांना किरकोळ दुखापती झाल्या. विशेष म्हणजे कारमधील 10 वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून माहिती दिल्याने अपघाताची तातडीने दखल घेता आली.

निखिल शशिकांत पांढरीकर आणि शशिकांत माधवराव पांढरीकर (दोघेही रा. हरिभाऊ कॉलनी, अमरावती) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर पल्लवी अभिजित काशीकर, यक्षित अभिजित काशीकर आणि शरयू शशिकांत पांढरीकर यांना किरकोळ दुखापती झाल्या. सर्व जखमींना प्राथमिक उपचारांसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घनदाट जंगल, खोल दरी आणि अवघड भौगोलिक परिस्थिती असूनही रेस्क्यू पथकाने दोरखंड, सुरक्षा साधने व आवश्यक उपकरणांच्या सहाय्याने बचावकार्य राबवले. या मोहिमेत अजित जाधव, आशिष बिरामणे, अनिकेत वाघदरे, संकेत सावंत, ओंकार शेलार, ऋषिकेश जाधव, साई हवालदार, विकांत जाधव, सुनील भाटिया, सुजित कोळी, अमित कोळी आणि अनिल केळगणे यांचा सहभाग होता.

दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. 10 वर्षीय मुलाने दाखवलेल्या धैर्यामुळे वेळेत मदत पोहोचली आणि मोठी जीवितहानी टळली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आंबेनळी घाटात अपघातांची मालिका सुरूच असून वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3198808
Share This Article