विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार घोषित
नवी दिल्ली– दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची शनिवारी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये ‘विज्ञान रत्न’सह आठ ‘विज्ञानश्री’, १४ ‘विज्ञान युवा’ आणि एक ‘विज्ञान संघ’ पुरस्काराचा समावेश आहे. पद्म पुरस्कारांच्या धरतीवर बेतलेले राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाआधारित नवोन्मेषाच्या क्षेत्राअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि नवोन्मेषकारांनी यांनी दिलेल्या उत्कृष्ट आणि प्रेरणादायी योगदानाचा देशातील सर्वोच्च सन्मान म्हणून दिले जाणारे, 2025 या वर्षासाठीचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार घोषित करण्यात आले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संगणकीय विज्ञान, पृथ्वी विज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, अणुऊर्जा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि इतर संलग्न क्षेत्र अशा 13 क्षेत्रांसाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांमधून राष्ट्रीय विकासासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता आणि तंत्रज्ञाना क्षेत्रातील नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते.
वर्ष 2025 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कोणत्याही क्षेत्राकरता राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कार विजेत्यांची नावे खाली नमूद केली आहेत:
– विज्ञान रत्न : प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर (भौतिकशास्त्र), मरणोत्तर)
– विज्ञान श्री : डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह (कृषी विज्ञान), डॉ. युसूफ मोहम्मद शेख (अणुऊर्जा), डॉ. के थंगराज (जीवशास्त्र), प्राध्यापक प्रदीप थलाप्पिल (रसायनशास्त्र), प्राध्यापक अनिरुद्ध भालचंद्र पंडित (अभियांत्रिकी विज्ञान), डॉ.एस. वेंकट मोहन (पर्यावरण विज्ञान), प्राध्यापक महान एमजे (गणित आणि संगणक विज्ञान), जयन एन (अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान)
– विज्ञान युवा : डॉ. जगदीश गुप्ता कापुगंटी (कृषी विज्ञान), डॉ. सत्येंद्र कुमार मांगरथिया (कृषी विज्ञान), देबर्का सेनगुप्ता (जीवशास्त्र), डॉ. दीपा आगाशे (जीवशास्त्र), डॉ. दिब्येन्दू दास (रसायनशास्त्र), डॉ. वलीउर रहमान (पृथ्वी विज्ञान), प्राध्यापक अर्कप्रवा बसू (अभियांत्रिकी विज्ञान), प्राध्यापक सब्यसाची मुखर्जी (गणित आणि संगणक विज्ञान), प्राध्यापक श्वेता प्रेम अग्रवाल (गणित आणि संगणक विज्ञान), डॉ. सुरेश कुमार (वैद्यकशास्त्र), प्राध्यापक अमित कुमार अग्रवाल (भौतिकशास्त्र), प्राध्यापक सुहृद श्रीकांत मोरे (भौतिकशास्त्र), अंकुर गर्ग (अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान), प्राध्यापक मोहनशंकर शिवप्रकासम (तंत्रज्ञान आणि नवोन्मेष)
– विज्ञान टीम : टीम – अरोमा मिशन, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (कृषी विज्ञान)
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दिग्गजांचा सन्मान करून, भावी पिढ्यांना प्रेरणा देणे, संशोधन परिसंस्थेला बळकट करणे तसेच जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश म्हणून भारताच्या वाटचालीला गती देणे हा राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराचा उद्देश आहे.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित केला जाईल आणि पुरस्कार विजेत्यांना त्याबाबत स्वतंत्रपणे कळवले जाईल.
डॉ. नारळीकर यांचा थोडक्यात परिचय
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते, तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली. डॉ. नारळीकर यांना पद्मविभूषण (2004), महाराष्ट्र भूषण (2010) आणि साहित्य अकादमी (2014) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्य संपदा – अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.
इतर विज्ञान विषयक पुस्तके – अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र).
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार जाहीर






