GRAMIN SEARCH BANNER

लांजा, राजापूरातील दोन महिलांना राज्यस्तरीय “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार”

Gramin Varta
487 Views

पुणे : ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार – २०२५” हा मानाचा राज्यस्तरीय सन्मान यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला. लांजा तालुक्यातील विजेता विजय मोर्ये आणि राजापूर तालुक्यातील सुवर्णा गणपत राघव यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला.

लांजा येथील विजेता विजय मोर्ये यांनी महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य, सांस्कृतिक उपक्रम, कला क्षेत्रातील कामगिरी तसेच वंचित घटकांसाठी सामाजिक हस्तक्षेप अशा विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.

तर सुवर्णा गणपत राघव, अधीक्षिका – वात्सल्य मंदिर ओणी बालगृह, राजापूर, यांनी मागील २२ वर्षांपासून अनाथ, एक पालक, वंचित तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या संरक्षण, पुनर्वसन आणि शिक्षणासाठी केलेल्या निष्ठावान सेवेसाठी “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार – २०२५” पटकावला. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे अनेक बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत.

हा राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. नितीन वाघमोडे – आयकर विभाग आयुक्त, पुणे व प्रा. शिवाजी खांडेकर – सरचिटणीस, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, महाराष्ट्र राज्य, ॲड. प्रियदर्शनी कोकरे – सुप्रसिद्ध व्याख्यात्या, डॉ. सारिका शहा – मिसेस इंडिया 2018 व मिसेस वर्ल्ड 2021, डॉ. ॲड. अंजना खताळ – वरिष्ठ विधीज्ञ, मुंबई उच्च न्यायालय यांच्याहस्ते वितरीत करण्यात आला.

पुणे येथे पार पडलेला पुरस्कार सोहळा भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. सामाजिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दोन्ही पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार स्वीकृतीदरम्यान विजेता मोर्ये म्हणाल्या,
“हा पुरस्कार माझ्या सामाजिक आणि कलाक्षेत्रातील कार्याला नव्याने प्रेरणा देणारा आहे.”

तर सुवर्णा राघव यांच्या निःस्वार्थ सेवायात्रेचे कौतुक करत मान्यवरांनी त्यांचे काम “समाजासाठीची खरी प्रेरणा व मार्गदर्शन” असल्याचे मत व्यक्त केले.

या राज्यस्तरीय सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून दोन्ही समाजसेविकांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3376279
Share This Article