एजाज कुरेशी हत्या प्रकरण: पुराव्याची विल्हेवाट लावणाऱ्या तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

चिपळूण: मालाड येथील एजाज कुरेशी हत्या प्रकरणातील गुढ उकलल्यानंतर, या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी ६ तारखेला या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, जिथे न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात करण्याचे आदेश दिले. या खळबळजनक प्रकरणात विशाल विजय खोडदेकर (रा. रामपूर), जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) आणि सागर ब्रिद (रा. रेहळ भागाडी) अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

हे संपूर्ण प्रकरण अत्यंत थरारक असून, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मालाड येथे जन्नतुलनिसा खान हिच्या घरी तिचा मित्र विशाल खोडदेकर याने एजाज कुरेशी यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत कुरेशी यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी खोडदेकर आणि खान यांनी कुरेशी यांचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि १५ नोव्हेंबर रोजी चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे खोडदेकर यांच्या मालकीच्या जागेत आणून तो दफन केला. अनेक महिने हे प्रकरण दडपून राहिले होते, मात्र फेब्रुवारी महिन्यात एका अनपेक्षित घटनेमुळे या हत्याकांडाचा खुलासा झाला.

विशाल खोडदेकर फेब्रुवारी महिन्यात जेव्हा रामपूर येथील त्या जागेची पाहणी करण्यासाठी आला होता, तेव्हा त्याला वन्य प्राण्यांनी जमीन उकरल्यामुळे कुरेशी यांच्या मृतदेहातील काही हाडे बाहेर पडलेली आणि विखुरलेली दिसली. दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर आल्याने घाबरलेल्या खोडदेकरने हत्येचा पुरावा कायमचा नष्ट करण्याच्या हेतूने ती सर्व हाडे गोळा करून त्यावर डिझेल ओतून ती जाळली. मात्र, रामपूर परिसरात जळालेली हाडे सापडल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यातून या संपूर्ण हत्येचा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा भयानक कट उघडकीस आला. सध्या हे तिन्ही आरोपी कारागृहात असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *