GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी एमआयडीसीतील प्रिंटिंग कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Gramin Varta
404 Views

रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील ‘क्वालिटी प्रिंटर्स’ या प्रिंटिंग कंपनीच्या कार्यालयाला शनिवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने कंपनीचे कार्यालय पूर्णतः जळून खाक झाले असून या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एमआयडीसी परिसरात रात्री उशिरा आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कंपनीच्या वरच्या मजल्यावरील यंत्रसामग्री, कागदपत्रे तसेच इतर साहित्य आगीत पूर्णपणे नष्ट झाले. मात्र आग लागल्याची माहिती वेळेत मिळाल्यामुळे तळमजल्यावरील काही साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले.

या आगीत कंपनीतील संगणक, कपाटे, महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रिंटिंगसाठीचे साहित्य जळून खाक झाल्याने कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. तब्बल अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.

दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची अधिकृत चौकशी सुरू असून, एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी घडलेल्या या आगीमुळे औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

3072691
Share This Article