राजापूर : शहरातील नागरिकांची दैनंदिन कामांसाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी नगरसेवक महेश शिवलकर यांनी विविध सेवा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मोबाइल दुरुस्तीपासून बँकिंग, कुरिअर आणि आधार अपडेटपर्यंतच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एकीकृत नागरी सेवा सुविधा केंद्र उभारण्याची मागणी त्यांनी नगराध्यक्षांकडे केली आहे.
याबाबतच्या निवेदनात शिवलकर यांनी नमूद केले की, सध्या नागरिकांना वेगवेगळ्या कामांसाठी अनेक ठिकाणी जावे लागते. वेळेवर कारागीर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. तसेच काही ठिकाणी सेवा शुल्क, दर्जा आणि विश्वासार्हतेबाबत शाश्वती नसल्याने फसवणुकीच्याही घटना घडतात.या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक कॉम्प्लेक्स उभारून नोंदणीकृत कारागीर व सेवा पुरवठादारांना स्वतंत्र गाळे उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
प्रस्तावित सुविधा केंद्रात घरगुती दुरुस्ती (इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार, रंगकाम, साफसफाई, चिऱ्यांची कामे), इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती (मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, एसी), दैनंदिन सेवा (कुलूप व पंखे दुरुस्ती), स्वच्छता सेवा (पेस्ट कंट्रोल, पाण्याच्या टाकीची सफाई), इतर सुविधा (झेरॉक्स, आधार अपडेट, कुरिअर सेवा), आपत्कालीन सेवा (२४x७ हेल्पलाइनसह तातडीची मदत अशा सुविधा पुरविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिवलकर यांच्या मते, या उपक्रमामुळे नागरिकांना खात्रीशीर व दर्जेदार सेवा मिळतील. स्थानिक तसेच अन्य भागातील कुशल कारागिरांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय गाळ्यांच्या भाड्यातून नगर परिषदेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोतही निर्माण होईल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अधिक सुरक्षित आणि सोयीची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी देऊन जागा आणि अर्थसंकल्प निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.






