GRAMIN SEARCH BANNER

PFAS च्या नियंत्रणाबाबत भारतात कायदा नाही, कोकणातील प्लांट तत्काळ बंद करा; रोहित पवारांची मागणी

Gramin Varta
122 Views

मुंबई : इटलीच्या त्रिसिनो शहरातून हद्दपार झालेली मिटेनी एस.पी.ए. ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. कारण मिटेनी ही कंपनीच्या कारखान्यात पीएफएएस (Per and Polyfluoroalkyl Substances) रसायन तयार होत होते, जे माती, पाणी आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहते.

या रसायनामुळे इटलीतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असून सुमारे साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांना कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व यासारख्या आजारांचा धोका वाढल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या कंपनीचा प्लांट तत्काळ बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, इटलीत मिटेनी नावाच्या कंपनीतून जलाशयात सोडण्यात आलेले PFAS केमिकल शरीरात गेल्याने तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना कॅन्सर सारखे गंभीर आजार झाले आणि 4000 नागरिक मृत्युमुखी पडले. नागरिकांनी आंदोलन करून ही कंपनी बंद पाडली. मात्र बंद पाडलेल्या याच कंपनीच्या मशिनरी विकत घेऊन भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीने आपल्या रत्नागिरी एमआयडीसीमध्ये प्लांट लावला आहे. ज्यातून हे हानिकारक PFAS बाहेर पडत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, PFAS च्या नियंत्रणाबाबत भारतात कोणताच कायदा अस्तित्वात नसताना अशा हानिकारक उद्योगास परवानगी का देण्यात आली? तसेच शासनाच्या लेखी कोकणवासीयांच्या जीवनाची किंमत शून्य आहे का? असे प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी म्हटले की, शासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्काळ हा प्लांट बंद करावा, त्याचबरोबर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3073036
Share This Article