GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसीतील कंपनीतून अडीच लाखांची वजन मापे लंपास

Gramin Varta
34 Views

खेड: तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील नोव्होकेम टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपनीतून तब्बल २ लाख ५४ हजार ९५० रुपये किमतीची लोखंडी वजन मापे चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका आयशर ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २५ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली आहे. फिर्यादी अमोल आनंद अकुलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीच्या पॅकिंग स्टोअरच्या बाहेरील बाजूस लाकडी पॅलेटवर २० किलो वजनाची लोखंडी षटकोणी आकाराची वजन मापे ठेवली होती. या साठ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जात होते. १ एप्रिल रोजी सायंकाळी अकुलकर यांनी २५ वजन मापे मोजून ठेवली होती, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पाहणी केली असता, त्यातील १० मापे गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरीचा संशय आल्याने कंपनी प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. त्यामध्ये २ एप्रिल रोजी सकाळी ८.२० वाजता कंपनीत आलेल्या एम.एच. ०६ बी.डब्ल्यू. ३०८९ या क्रमांकाच्या आयशर ट्रकचा चालक संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. हा चालक ट्रकच्या केबिनमधून उतरून क्लिनर बाजूच्या दरवाजापाशी सुमारे १० मिनिटे रेंगाळत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे. याच चालकाने पॅलेटवरील १० वजन मापे चोरल्याचा प्राथमिक संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे.

या चोरीमध्ये दोन वेगवेगळ्या कंपन्यांकडून खरेदी केलेली एकूण २२१ वजन मापे चोरीला गेली आहेत. यामध्ये सिद्धीविनायक सिस्टम्सकडून घेतलेली १ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीची १५० मापे आणि अर्पन इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनकडून घेतलेली ६७ हजार ४५० रुपये किमतीची ७१ मापे, अशा एकूण २ लाख ५४ हजार ९५० रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी संजय सितापराव याच्या संदर्भात अधिक तपास सुरू केला आहे. भरवस्तीत आणि सुरक्षा व्यवस्था असलेल्या एमआयडीसी क्षेत्रात अशा प्रकारे वजन मापांची चोरी झाल्याने औद्योगिक परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Total Visitor Counter

3322782
Share This Article