संशयित बोटींची तपासणी मेरीटाईम बोर्डाने करावी-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी: महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने संशयित बोटींची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
नार्को कोओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपअधिक्षक कार्यालयाकडे प्रलंबित असणारे तडीपारीचे प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावेत. सर्व विभागांनी गंभीरपणे अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेवून, सतर्क राहून कारवाई करावी. विशेषत: सागरी मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करावे. पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी यावेळी कार्यवाहीबाबत माहिती दिली.