GRAMIN SEARCH BANNER

आंबा घाटातील लुटमार प्रकरण: देवरुख पोलिसांनी आणखी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Gramin Varta
321 Views

देवरुख/ (सुरेश सप्रे): रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या प्रकरणातील फरार असलेल्या आणखी दोन आरोपींना जेरबंद करण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या आता सात झाली असून, अद्याप एक आरोपी फरार आहे. अरबाज मजीद बांगी (वय ३१, रा. मजगाव, रत्नागिरी) आणि शार्दूल सुनील किर (वय २४, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दखण ते आंबा घाट दरम्यान प्रथमेश दळवी यांची गाडी अडवून त्यांना गाडीतून खाली उतरवण्यात आले होते. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून, दमदाटी व शिवीगाळ करत त्यांच्याकडील २५ हजार रुपये जबरदस्तीने लुटण्यात आले होते. या गंभीर घटनेनंतर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमांन्वये ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तात्काळ तपास पथके रवाना केली होती. यापूर्वीच पोलिसांनी फरहान रशिद मुल्ला, प्रथमेश सचिन भाटकर, सर्वेश सुभाष किर, धर्मलिंगम विजयकुमार नाडर आणि भूषण बिपेंद्र सावंत या पाच जणांना अटक केली होती. हे पाचही आरोपी सध्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भट कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पेंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव आणि प्रशांत साळुंखे यांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणातील एका फरार आरोपीचा शोध पोलीस आता युद्धपातळीवर घेत असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

3278334
Share This Article