GRAMIN SEARCH BANNER

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा मार्कंडी, पाग, वांगडे मोहल्ला येथे दौरा

Gramin Varta
217 Views

चिपळूण शहरातील स्वच्छता, पाणी व आरोग्य यावर भर

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी गुरुवारी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य विषयांकडे महत्त्वपूर्ण लक्ष देत विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा केला.

नगराध्यक्ष सकपाळ यांनी सर्वप्रथम मार्कंडी येथील भारतीय समाजसेवा केंद्राच्या शेजारील नाल्याची पाहणी केली. त्यांनी या नाल्याचे स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाला आवश्यक सूचना दिल्या, तसेच नाला ओले किंवा वाहणारे पाणी अडथळ्याशिवाय वाहावे, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणी मोकळ्या जागेत ओपन जिम स्थापन करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

यानंतर, त्यांनी पागमळा येथे स्थानिक नगरसेवक शुभम पिसे व उमा देसाई यांच्या सूचनेनुसार दौरा केला. येथे मारुती मंदिर शेजारी गणेश विसर्जनासाठी संरक्षक भिंत बांधणे, गणेश घाट बांधणे, शेड उभारणे, तसेच मालकाचे हरकत नसेल तर रस्ता तयार करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिली. या ठिकाणी त्यांनी गटारांची पाहणीही केली व आरोग्य विभागाला योग्य ती सूचना दिली.

यानंतर, नगराध्यक्ष सकपाळ यांनी वांगडे मोहल्ला येथे स्थानिक नगरसेवक योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शोभला हॉटेल शेजारील तुंबलेला नाला स्वच्छ करण्यासाठी व सांडपाणी वाहण्या-साठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी रस्त्याची देखभाल व निरीक्षणसुद्धा त्यांनी केले.

या दौऱ्यात नगराध्यक्षासोबत नगरसेविका हर्षाली पवार, नगरसेवक कपिल शिर्के, उदय जुवळे, संदीप भिसे, रसिका देवळेकर, निहार कोवळे, नगरसेवक शुभम पिसे व उमा देसाई, संदेश पवार, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, धीरज नलावडे, माजी नगरसेवक बरकत वांगडे, रऊफ वांगडे, उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, प्रथमेश कापडी, निशांत जंगम, तसेच आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगराध्यक्ष सकपाळ यांनी दौऱ्यात दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनातून शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवा सुधारणे, तसेच सुरक्षित व सोयीस्कर सार्वजनिक सुविधा उभारणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3072146
Share This Article