राजापूर: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी आश्रमातर्फे नूतन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी, पालक, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय विनामूल्य योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात योगशिक्षक अशोक लोळम यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सुलभ योगक्रिया आणि विविध आसने करून घेत, योगाभ्यासाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ओणी आश्रमाचे प्रमुख उल्हासगिरी महाराज यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. सुखी, आनंदमय आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगाभ्यासाची आवश्यकता असल्याचे सांगत, महाराजांनी सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात नूतन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी येथील विद्यार्थ्यांना आश्रमाच्या वतीने योगाची प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. या योग प्रशिक्षणाबद्दल आश्रमाचे भक्त आणि योग प्रशिक्षक श्री. अशोक लोळम यांचा श्री. मिरगुले सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरात योगाभ्यासाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे.