राजन लाड (जैतापूर)
आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने सामाजिक सलोखा समितीची महत्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीमध्ये सार्वजनिक शांतता राखणे, सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द कायम ठेवणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे, तसेच अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करणे या बाबत सखोल चर्चा करण्यात आली. येणारे उत्सव शांततेत व सौहार्दाने पार पडावेत यासाठी स्थानिक नागरिक, समिती सदस्य आणि पोलीस प्रशासन यांच्यात सुसंवाद व समन्वय अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
अमली पदार्थांविरोधात पोलिसांची भूमिका ठाम: गावोगावी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गैरप्रकार किंवा नशेखोरी टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे व पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
धार्मिक तेढ, समाजात द्वेष पसरवणारे किंवा अफवा पसरवणारे संदेश व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर प्रसारित केल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.
“गणेशोत्सव व दहीहंडी यांसारखे सण हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहेत. सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखून हे सण आनंदाने साजरे करावेत. कोणताही अनुचित प्रकार, अफवा किंवा द्वेषमूलक मजकूर पसरवू नये. पोलिस प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज आहे, नागरिकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी यावेळी केले.
या बैठकीला विश्वास करगुटकर, नदीम तमके, संतोष चव्हाण, संजय नाटेकर, वजूद बेबजी, राजाराम पारकर, पत्रकार राजन लाड, समीर सोलकर, दशरथ मांजरेकर, नंदू मिरगुले, मजीद सायेकर, पंढरीनाथ वाडेकर, देवेंद्र करगुटकर, प्रसाद करगुटकर, धनेश्वर खाडये , मनीषा पाटील, सुहास पारकर, देवनाथ पारकर, नुरुद्दीन हुशये, अनिल नार्वेकर आदींसह सामाजिक सलोखा, शांतता कमिटी सदस्यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
नाटे सागरी पोलीस ठाण्यात सामाजिक सलोखा समितीची सभा संपन्न
