GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी :  प्रभाग क्रमांक ६ मध्ये ‘आयात उमेदवारां’चा विस्फोटक मुद्दा

Gramin Varta
211 Views

निलेश आखाडे व प्राजक्ता रूमडे यांची तीव्र नाराजी; अनेक वर्षे घाम गाळलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा अनादर?

रत्नागिरी :  रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपमध्ये प्रचंड असंतोष उसळला आहे. अनेक वर्षे पक्षासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या स्थानिक, निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून अचानक *‘आयात उमेदवारां’*ना प्राधान्य दिल्याचा आरोप वरिष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे.

याबाबत भाजपचे जुने, प्रामाणिक आणि जनसंपर्कात पुढे असलेले कार्यकर्ते निलेश आखाडे आणि प्राजक्ता रूमडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. दोघांनीही पक्षाने स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचे सांगत हा निर्णय अपरिपक्व आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा असल्याचे ठणकावले.

असा रोष व्यक्त करत कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की प्रभाग क्रमांक सहा हा स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे जपलेला मतदारसंघ असून, बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे पक्षाच्या जनाधारावरच प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.

प्रभाग ६ मध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे प्रचारात अपेक्षित उत्साह दिसत नाही. “निष्ठावंतांची उपेक्षा आणि बाहेरच्यांचा सन्मान” अशीच चर्चा तळागाळात सुरू असून, पक्ष नेतृत्वाने हा ज्वलंत प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी स्थिती दिसत आहे.

निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, प्रभागातील स्थानिक नेतृत्वाचा आदर राखावा आणि घेतलेले निर्णय त्वरित पुनर्विचारात घ्यावेत, अशी अपेक्षा नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये ‘आयात उमेदवारां’चा मुद्दा आता भाजपसाठी तणावाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पुढे पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3366875
Share This Article