वारिशे हत्या प्रकरणातील ‘थार’ गाडी बहिणीच्या ताब्यात देण्याचे न्यायालयाचे आदेश

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या चिरडून करण्यात आलेल्या हत्येप्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याची महिंद्रा थार गाडी फायनान्स कंपनीने ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या गाडीचा ताबा पुन्हा मिळावा यासाठी आंबेरकर याच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी करत रत्नागिरी सत्र न्यायालयाने संबंधित थार गाडी आरोपीची बहीण प्रतिक्षा खडपे हिच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

महानगरी टाईम्स दैनिकाचे राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी सुमारे १ वाजता हत्या करण्यात आली होती. राजापूर येथील पेट्रोल पंपावरून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना पंढरीनाथ आंबेरकर याने महिंद्रा थार गाडी (एमएच ०८ एएक्स ६१००) चालवत वारिशे यांना चिरडून ठार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचे सांगत पोलिसांनी जप्त केलेली थार गाडी तात्पुरत्या स्वरूपात आपल्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी आंबेरकर याच्यावतीने न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने काही अटी व शर्ती घालून ही गाडी आरोपीच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली होती. मात्र संबंधित थार गाडी ही फायनान्स कंपनीकडून कर्जावर खरेदी करण्यात आलेली असून कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने करारातील अटींनुसार गाडीचा ताबा घेतला होता.
यानंतर थार गाडी पुन्हा मिळावी यासाठी आंबेरकर याच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जाला विरोध करताना फायनान्स कंपनीने न्यायालयास सांगितले की, कर्जदार पंढरीनाथ आंबेरकर सध्या तुरुंगात असून त्याने मासिक हप्त्यांची परतफेड केलेली नाही. तसेच वाहन कर्जाबाबतची माहिती न्यायालयास देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे करारातील अटींनुसार वाहनाचा ताबा घेण्यात आला असून कर्जवसुलीसाठी वाहन लिलावात विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, खटल्यादरम्यान संबंधित थार गाडी अटी व शर्तींसह आरोपीच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेली होती आणि गरज भासल्यास ती न्यायालयात सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे फायनान्स कंपनीने सदर गाडी आरोपीच्या बहिणीच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. या कारणांवरून सत्र न्यायालयाने थार गाडी प्रतिक्षा खडपे हिच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *