चिपळूणच्या बहुप्रतीक्षित उड्डाणपुलावर डांबरीकरणाचा धडाका; गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी सर्व्हिस रोडची लेन वाढवली, जोडरस्ते उत्सवानंतर पूर्ण होणार

Gramin Varta
57 Views

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा श्वास रोखून धरणाऱ्या चिपळूण शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उतारा ठरणारा बहादूरशेख नाका ते हॉटेल अतिथी परिसरादरम्यानचा बहुप्रतीक्षित उड्डाणपूल आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्व स्लॅबचे मुख्य बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, पावसाने उघडीप देताच ठेकेदार कंपनीने तब्बल १,८४० मीटर लांबीच्या या महाकाय पुलावर युद्धपातळीवर डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. रस्त्याच्या पृष्ठभागाची समतलता आणि वाहतुकीसाठी आवश्यक तांत्रिक पूर्तता वेगाने पूर्ण केली जात असली, तरी दोन्ही बाजूंना पुलाशी जोडणाऱ्या रस्त्यांचे काम मात्र गणेशोत्सवानंतरच सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

येत्या गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो चाकरमानी दाखल होणार असून महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असणार आहे. अशा वेळी जोडरस्त्यांचे काम उकरल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय आणि कोंडी होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन हे काम गणेशोत्सवापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. त्याऐवजी उत्सवकाळात चिपळूण शहरांतर्गत वाहतूक सुरळीत व गतिमान राहावी यासाठी उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडची प्रत्येकी एक लेन वाढविण्याचे काम तातडीने पूर्ण केले जात आहे. सोबतच साईडपट्ट्यांची आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा करून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुलावरील डांबरीकरणाची संपूर्ण प्रक्रिया आटोपण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. गणेशोत्सवापूर्वी पुलाच्या मुख्य भागावरील कामे मार्गी लावून उपलब्ध मार्गाचा अधिकाधिक सक्षम वापर करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. जोडरस्त्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय उड्डाणपुलावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार नसली, तरी सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणामुळे सणासुदीच्या दिवसांत चिपळूणकरांसह कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना तात्पुरता मोठा दिलासा मिळणार असून, आगामी काळात जोडरस्ते जोडले जाताच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

Total Visitors :
4836375
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *