GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील सीसीटीव्ही बंद पडल्याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा

Gramin Varta
167 Views

४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

रत्नागिरी : शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. एखादा गुन्हा घडल्यानंतर संबंधित परिसरात सीसीटीव्ही नसणे किंवा ते बंद असल्याचे प्रकार वारंवार समोर येत होते. या गंभीर बाबीची दखल घेत रत्नागिरी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश आव्हाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही बसविणाऱ्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत गोपाळ थवानी आणि कुलदीप एराम (संचालक, पोटाकॉल वन आयटी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांविरोधात ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरात सीसीटीव्ही बसविणे व त्यांची देखभाल करण्यासाठी रत्नागिरी सिटी सर्व्हिलन्स प्रोजेक्ट अंतर्गत १७ जानेवारी २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत काम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शहरात सीसीटीव्ही बसविणे तसेच त्यांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी पोटाकॉल वन आयटी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आली होती.

मात्र कंपनीने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन न करता अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवले. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला, असा आरोप पोलिसांनी केला आहे. रत्नागिरी शहरात व लगतच्या परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना तपासासाठी सीसीटीव्ही महत्त्वाचे ठरतात. मात्र गुन्हा घडल्यानंतर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

कंपनीकडून रक्कम स्वीकारूनही अपेक्षित सेवा न दिल्याने ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२)(३), २२१ आणि २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3214774
Share This Article