दापोली : चोरट्यांना आता देवदेवतांची भीती राहिलेली नाही. घरफोडी नंतर आता चोरट्यांनी गावातील मंदिराकडे मोर्चा वळवला आहे. दापोली तालुक्यातील शिरसोली गावातील मंदिर फोडून हजारोंचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत. ही घटना १८ जून सकाळी १० ते १९ जून सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद सुरेश विष्णू जाधव यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील मंदिराच्या दर्शनी दरवाजाची बाहेरील कडी उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या सभागृहातून आणि गाभाऱ्यातून पितळीच्या चार लहान-मोठ्या घंटा (अंदाजे किंमत २०,००० रुपये), सुमारे साडेतीन फूट उंचीच्या पितळीच्या दोन मोठ्या समया (अंदाजे किंमत १०,००० रुपये), तांब्याचे दोन कलश आणि तांब्याचे ताम्हण (अंदाजे किंमत २,००० रुपये), तसेच पितळी आरतीचे ताट (अंदाजे किंमत ५०० रुपये) असा एकूण ३२,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
फिर्यादी जाधव यांनी गावातील ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर आज (१ जुलै रोजी) दापोली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बुरोंडकर करत आहेत.
दापोलीत मंदिर फोडून हजारोंचा ऐवज लंपास, परिसरात भिती
