लांजा : तालुक्यातील कुर्णे पडयेवाडी येथील नमन, जाकडीनृत्य कलावंत बाळकृष्ण पडये यांना कुणबी समाजोन्नती संघ मुंबई लांजा शाखेच्यावतीने मुबंई येथे एका सोहळ्यात पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोकणात नमन, जाकडी, भजन, कीर्तन, भारुड, हरिपाठ अशा विविध लोककला जोपासल्या जात असून या कला समाज प्रबोधनही करत आहेत. अनेक कलावंत या लोककलांच्या माध्यमाधून नावारूपाला आले आहेत. असेच कलेवर निसिम प्रेम करणारे लांजा तालुक्यातील कुर्णे पडयेवाडी येथील नमन व जाकडीनृत्य कलावंत बाळकृष्ण पडये हे बाल वयापासून ते आजपर्यंत लोककलेची सेवा करत आहेत. अनेक वर्षांपासून करत आलेल्या नमन, जाकडी सेवेतून लोककलावंत म्हणून त्यांच्या कार्याची कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांनी दखल घेतली. पडये यांचा नुकताच मुंबई येथे एका सत्कार सोहळ्यात मान्यवरांच्याहस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सोहळ्याला मुंबई-पुणे व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सन्मानपत्र,शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. लांजा तालुक्यातील कुर्णे सारख्या ग्रामीण भागात लोककला अखंडित रहावी व तिची सेवा करणाऱ्या बाळकृष्ण पडये यांचा मुंबईत गौरव झाल्याने कुर्णे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लांजा : कुर्णे पडयेवाडी येथील लोकलावंत बाळकृष्ण पडये यांचा मुंबईत गौरव
