फाटक हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात
रत्नागिरी : शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी योग महत्त्वाचा असून दैनंदिन जीवनात योग आचरण करावे, असे विचार योग प्रशिक्षक नीता साने यांनी व्यक्त केले. औचित्य होते, फाटक हायस्कूल मधील ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे.
फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात विविध योगाच्या प्रात्यक्षिकांसह योग दिन संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साने यांच्यासह भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी वर्षा ढेकणे, पल्लवी पाटील, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, मानसी करमरकर, सायली बेर्डे, भक्ती दळी , शैलेश बेर्डे तसेच मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘ एक पृथ्वी एक आरोग्य ‘ या संकल्पनेवर आधारित योग दिनाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देऊन योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले. क्रीडा विभाग प्रमुख मंदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांसह सहावी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी योगासनांसह कपालभाती, प्राणायाम, ध्यानस्थिती, शयनस्थितीतील विविध आसनांचे प्रात्यक्षिक केले. मंजिरी आगाशे यांनी दिलेल्या संकल्प आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मंदार सावंत यांनी मानले.