GRAMIN SEARCH BANNER

निवोशी-दणदणेवाडीतील पाखाडी कामाचा अनेक वर्षांचा वनवास संपला; ग्रामस्थांच्या एकजुटीला अखेर यश

Gramin Varta
244 Views

गुहागर/उदय दणदणे:  गुहागर तालुक्यातील निवोशी-दणदणेवाडी येथील ग्रामस्थांसाठी गेली अनेक वर्षे जिव्हाळ्याचा आणि संघर्षाचा विषय ठरलेल्या पाखाडीचे काम अखेर सुरू झाले आहे. अनेक वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि प्रशासकीय संघर्षानंतर गावातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळाल्याने दणदणेवाडीतील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.

निवोशी गावाचा विचार करता, दणदणेवाडीला विकासाच्या बाबतीत नेहमीच दुय्यम स्थान दिले गेल्याची ग्रामस्थांची भावना होती. पाणी, वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठीही येथील रहिवाशांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. निवडणुका आल्या की राजकीय पुढाऱ्यांकडून आश्वासने मिळायची, मात्र निवडून आल्यावर दणदणेवाडीच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात असे, असा ग्रामस्थांचा आरोप होता. वाडीला केवळ मतांसाठी गृहीत धरले जात असल्याने विकासाला मोठी खीळ बसली होती. मात्र, या परिस्थितीवर मात करण्यासाठी वाडीप्रमुख आणि पत्रकार उदय दणदणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत विकासाचा ध्यास घेतला. वाडीप्रमुख संतोष दणदणे, अनंत दणदणे, रमेश दणदणे आणि सुरेश दणदणे यांनी ग्रामपंचायत स्तरावर पाखाडीच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांच्या या चिकाटीला यश आले असून पालशेत-निवोशी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पंकज बिर्जे यांनी दिलेल्या शब्दाला जागत हे काम मार्गी लावले आहे.

माजी उपसरपंच पंकज बिर्जे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या कामासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांतून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या पाखाडीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक कामासाठी स्वतःची जमीन देण्याची तयारी दर्शवत उदय दणदणे यांनी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिली, ज्यामुळे कामातील अडथळे दूर झाले. पंकज बिर्जे यांनी राजकारण बाजूला ठेवून केवळ विकासात्मक दृष्टीकोनातून निवोशी गावातील प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. दणदणेवाडीच्या उर्वरित पाखाडीचे कामही पुढील टप्प्यात लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन बिर्जे यांनी दिले आहे.

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपल्या वाडीत विकासाची गंगा आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. रखडलेले काम सुरू झाल्याने दणदणेवाडीत उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी स्थानिक नेतृत्व आणि माजी उपसरपंचांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Total Visitor Counter

3201008
Share This Article