लांजात देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट 

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

लांजा : भारतामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ लांजा तालुक्यात उपलब्ध करून देण्यात आली असून, या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मोलाची भर पडली आहे. लांजा-राजापूर तालुक्याचे आमदार किरण सामंत आणि उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे लांजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जागतिक स्तरावर चमकण्याची प्रचंड क्षमता असूनही त्यांना योग्य सुविधा व क्रीडा साहित्य मिळत नाही, ही उणीव ओळखून आमदार सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचाच हा सकारात्मक परिणाम असून, अशा प्रकारची अत्याधुनिक मॅट देशात प्रथमच लांजा येथे उपलब्ध झाली आहे.

या ‘लेव्हल-३’ मॅटमुळे आता लांजातील खेळाडूंना जागतिक दर्जाचा सराव करण्याची संधी मिळणार आहे. या मॅटचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह, लांजा येथे आमदार किरण सामंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आणि अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास सुनील कुरूप, गुरुप्रसाद देसाई, महेश खामकर तसेच लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार सामंत यांनी आपल्या तालुक्यातील मुला-मुलींना ऑलिम्पिक आणि जागतिक स्तरावर खेळताना पाहणे हे माझे स्वप्न आहे. ही मॅट केवळ सुविधा नसून खेळाडूंच्या यशाची पहिली पायरी आहे, असे सांगितले.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सामंत यांचे आभार मानले आहेत. यामध्ये अध्यक्ष व्यंकटेश कररा, सचिव लक्ष्मण कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाचे मार्गदर्शक परशुराम मासये, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे यांचा समावेश होता.

तसेच राष्ट्रीय पंच व प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, शीतल विरेंद्र आचरेकर, अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, गौरव दीपक खेडकर, गणेश ईश्वर तोंडारे, तेजस वडवलकर, योगेश ईश्वर तोंडारे यांसह सर्व खेळाडू व पालक यांनी आमदार सामंत यांचे आभार मानले.

दरम्यान, या सुविधेमुळे भविष्यात लांजा तालुक्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तायक्वॉंदो खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आमदार साहेबांच्या विकासकामांचा झंझावात पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *