रत्नागिरी :महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून आता शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. यापुढे ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘सातबारा’ आणि ‘आठ अ’चे उतारे अपलोड करण्याची गरज भासणार नाही, असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.
यापूर्वी काही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ‘सातबारा’ आणि ‘आठ अ’चे उतारे अपलोड न केल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते. या योजनांमध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर लाभ दिला जातो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी निगडित कामकाज सुसूत्रपणे पार पाडण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ योजना सुरू केली असून, यासाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि सातबारा उताऱ्याचा समन्वय साधून ‘ॲग्रीस्टॅक’ क्रमांकाची जोडणी केली जाते.
कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये लाभार्थी निवड पोर्टलद्वारे केली जाते. यंदाच्या वर्षीपासून या योजनांसाठी ‘ॲग्रीस्टॅक क्रमांक’ बंधनकारक असणार आहे. लाभार्थी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून छाननी केली जाते.
‘सातबारा’ व ‘आठ अ’ अपलोड न केल्याने ज्या त्रुटी आढळत होत्या, त्या दूर करण्यासाठी कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, आता ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी झाल्यानंतर ‘सातबारा’ किंवा ‘आठ अ’ अपलोड करण्याची आवश्यकता उरणार नाही.
कृषी योजनांसाठी आता ‘सातबारा’ व ‘आठ अ’ची गरज नाही-कृषी आयुक्तालयाचे निर्देश
