लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात लढा तीव्र; संघर्ष समितीच्या बैठकांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात आता लवकरच तीव्र लढा दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने जोरदार तयारी सुरू केली असून बाधित गावांमध्ये बैठकांचा धडाका लावला आहे. माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी कोतवली येथे झालेल्या विशेष बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या तीव्र व्यथा मांडल्या.

लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतील ‘पीपास’ हा घटक अत्यंत घातक असून त्याचे मानवी आरोग्यावर आणि निसर्गावर गंभीर दुष्परिणाम होणार आहेत. सध्या या परिसरातील अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असल्याने संघर्ष समितीने आता लक्ष्मी कंपनीला ‘चले जा’चा इशारा दिला आहे, तसेच प्रदूषण करणाऱ्या अन्य कंपन्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी एक धरणे आंदोलन झाले असून, आता मोठ्या आंदोलनाची तयारी म्हणून बाधित गावांमध्ये जनजागृती केली जात आहे.

कोतवली येथील बैठकीत सरपंच अक्षता तांबे, मुश्ताक सुर्वे, मंगेश तांबे, जाफर परकार, अन्वर खान, अजिम सुर्वे आणि बशीर मुजावर यांनी औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणामुळे गाव, बागायती आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगितले. प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या रोगराईने ग्रामस्थ विविध आजारांना बळी पडत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. या संकटातून सुटका करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले आणि आगामी आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दर्शवला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *