GRAMIN SEARCH BANNER

रायगडमध्ये बदलत्या हवामानाचा फटका; मासळीचे दर तिप्पट, मच्छीमार चिंतेत

Gramin Varta
3 Views

रायगड: बदलत्या हवामानाचा थेट परिणाम आता समुद्रातील मासेमारीवर दिसून येत असून ताज्या मासळीचे दर अक्षरशः तिपटीने वाढले आहेत. अत्याधुनिक फिश फाइंडर आणि सोनार यंत्रणादेखील निष्प्रभ ठरत असल्याने मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अनेक नौका मासळीविना परतत असून काही बंदरातच उभ्या असल्याचे चित्र आहे.

पहाटेची कडाक्याची थंडी आणि दुपारी वाढणारे तापमान यामुळे समुद्रातील पाण्याच्या तापमानात तीव्र चढ-उतार होत आहेत. परिणामी मासळीचे थवे खोल समुद्रात किंवा अनियमित पट्ट्यात स्थलांतर करत आहेत. त्यामुळे रडार आणि इको साउंडर यंत्रणांना मासे अचूकपणे शोधणे कठीण जात आहे. “यंत्रे दाखवतात एक, प्रत्यक्षात मासे असतात दुसरीकडे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक मच्छीमारांनी दिली.

या परिस्थितीचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. पापलेट, सुरमई, कोळंबी यांसारख्या लोकप्रिय मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. कालपर्यंत ४०० रुपयांत मिळणारे चार पापलेट आता १,२०० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी मासळी खरेदीकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.

बंदरात येणारी मर्यादित मासळी लिलावातच संपत असल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी ग्राहकांची रांग लागली असली तरी विक्रेत्यांकडे माल उपलब्ध नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे, एका फेरीसाठी लाखो रुपयांचा डिझेल व मनुष्यबळ खर्च करूनही अपेक्षित मासळी मिळत नसल्याने अनेक मच्छीमारांनी तात्पुरते नौका थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

बेकायदेशीर मासेमारी, बंदी काळातील शिकार आणि हवामानातील अस्थिरता या तिहेरी संकटामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय सध्या मोठ्या धोक्यात आल्याची चर्चा सुरू असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे.

Total Visitor Counter

3095669
Share This Article